चाणक्यनीती आणि शिवकारण वेदकाळापासून भारतीय राजनीतीच्या संकल्पना, राजनीतीची ध्येय ह्यांचे संदर्भ संस्कृतसाहित्यात सर्वत्र सासत्याने मिळत असले तरी केवळ राजनीतीला वाहिलेला ग्रंथ म्हणून कौटिल्य अर्थशास्त्राकडेच बघावे लागते. अर्थशास्त्राचा अभ्यास भारतात सर्व काळात निश्चितपणे होत होता. त्याचे सारे संदर्भ 'अर्थशास्त्र परंपरा' या प्रकरणात लेखिका डॉ. आसावरी बापट यांची अभ्यासपूर्वक दिले आहेत. अर्थशास्त्रातील राजाच्या संकल्पनेत चपखलपणे बसणारं व्यक्तिमत्त्व सतराव्या शतकात उदयाला आलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! शिवाजीराजांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला असल्याचे प्रत्यक्ष पुरावे लेखिकेच्या हाती लागले नसले तरी अर्थशास्त्रातील सूत्रे आणि छत्रपतींच्या चरित्रातील समान दुवे डॉ. आसावरी बापट यांनी उत्तम प्रकारे दाखवून दिले आहेत. त्याच वेळी अर्थशास्त्र आणि छत्रपतींच्या जीवनातील काही विरोधाभासही दाखवून दिला आहे. चाणक्यनीती आणि शिवकारण, या शतकोतरी पृष्ठाच्या पुस्तकातून भारतीय राजनीतीतील संशोधनाचे एक नवे दालन अभ्यासकांसाठी उघडले गेले आहे.